राजीनामा कसा लिहाल ?

प्रगती आणि वाढ हा आपल्या करीयरचा एक अविभाज्य घटक असून चांगली संधी मिळताच दुसर्या कंपनीत नोकरी करणे, आणि त्यासाठी आधीची सोडणे हे सहाजिकच आहे. हल्लीचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने नवनवीन संधी उपलब्ध असताना नोकरीत बदल होणे हे अटळ आहे. अशा वेळी आधीची नोकरी सोडताना योग्य आणि आवश्यक असलेल्या फॉर्मेलीटी निभावणे गरजेचे आहे जेणेकरून प्रशासनाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमचे त्यांच्याशी संबंध चांगले राहातील. राजीनामा लिहिताना योग्य ते आणि आवश्यक मुद्दे समाविष्ट केले पाहिजेत तशीच लिहिताना भाषा संयत असायला हवी. राजीनामा लिहीताना सकारात्मक दृष्टीकोन  ठेवणे खूप गरजेचे आहे.

राजीनामा म्हणजे काय आणि तो का लिहावा?

नोकरी सोडण्याच्या प्रक्रियेला राजीनामा देणे असे म्हणतात. या पत्रातून तुमची सध्या चालू असलेली नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त होते. नोकरी सोडताना हे पत्र लिहिणे खूप आवश्यक आहे कारण त्यातून तुमच्या प्रशासनाला याची माहिती होईल आणि त्यांना योग्य ती सोय करणे सोपे होईल, तसेच त्यांच्या कामाचे नुकसान होणार नाही. ही तुमच्या वरिष्ठांना दिलेली सूचना आहे ज्यावरून त्यांना पुढची तरतूद करणे सोपे पडेल.

राजीनामा कधी दिला पाहिजे?

तुम्ही ज्या तारखेपासून नोकरी सोडत आहात त्याच्या कमीत कमी एक महिना आधी तुम्ही ही सूचना देणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना आवश्यक असलेली तरतूद करणे शक्य होईल आणि कोणतीही गैरसोय होणार नाही. जितका लवकर तुम्ही राजीनामा द्याल तितके चांगले.

राजीनाम्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा?

तुमच्या राजीनाम्यात सर्व महत्वपूर्ण गोष्टींचा समावेश होणे आवश्यक आहे. त्यात खालील गोष्टी असणे अनिवार्य आहे.

  • तुम्ही नोकरी सोडत असल्याचा तपशील- तुम्ही नोकरी सोडत आहात याचा तपशील देणे अनिवार्य आहे.
  • शक्य असल्यास सोडत असल्याचे कारण (थोडक्यात)- तुम्ही नोकरी का सोडत आहात याचे कारण शक्य असल्यास थोडक्यात लिहा. तुम्ही नोकरी सोडत आहात आणि ती का सोडत आहात याचा तपशील असणे अनिवार्य आहे. उदा: नवी नोकरी, जागा बदलणे वगैरे.
  • तुमच्या पदाचा उल्लेख- तुम्ही ज्या पदावरून नोकरी सोडत आहात त्याचा उल्लेख अनिवार्य आहे. उदा: लेखापाल, अकौंटंट
  • सोडण्याची तारीख- तुम्ही किती तारखेपासून ही नोकरी सोडत आहात याचा उल्लेख करणे खूप आवश्यक आहे जेणेकरून प्रशासन त्याप्रमाणे नियोजन आणि नियुक्ती करू शकेल.
  • तुम्हाला काय शिकायला मिळाले याचा उल्लेख- तुम्ही किती वर्ष आणि किती काळ कामावर होतात आणि त्या काळात तुम्हाला काय काय शिकायला मिळाले या गोष्टी नक्कीच नमूद करा. तुमच्या प्रशासनाप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या जागी आलेल्या बदली व्यक्तीला प्रशिक्षण आणि योग्य ती मदत देण्याचे आश्वासन द्या. तुमच्या कंपनीला शुभेच्छा द्यायला विसरू नका.
  • तुमचा संपर्क- तुमचा संपर्क क्रमांक तसेच इतर काही गोष्टी नक्की नमूद करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला संपर्क करण्याची गरज कंपनीला भासली तर त्याचा उपयोग होईल.
  • स्वतःची ओळख- राजीनाम्याच्या सुरुवातीलाच तुमची ओळख थोडक्यात करून द्या. तुमचे पद नमूद करा. लिहिताना भाषा सरळ आणि साधी असू द्या.

राजीनामा लिहिताना लक्षात ठेवण्याचे महत्वाचे मुद्दे

राजीनामा लिहिताना थोड्या कल्पक पद्धतीने लिहिलात तर चांगला प्रभाव पडेल. सुरुवातीला तुम्ही कोणत्या पदावरून राजीनामा देत आहात, कोणत्या तारखेपासून तुम्ही कामावर येणे बंद कराल आणि शक्य असल्यास त्याचे कारण या सगळ्या गोष्टी नमूद करणे आवश्यक आहे. लिहिताना सध्या सोप्या पण आकर्षक अशा भाषेत राजीनामा लिहावा. राजीनाम्याचे विविध भाग कसे लिहावेत हे तुम्हाला या लेखात समजेल.

आभार माना

ज्या प्रशासनाने आपल्याला एक चांगली संधी दिली, जिथे आपल्याला खूप काही शिकायला मिळाले त्यांचे आभार मानणे, त्यांना धन्यवाद देणे आवश्यक आहे किंबहुना तुमच्या राजीनाम्याचा हा एक अविभाज्य भाग आहे. तुम्ही ज्या महत्वाच्या गोष्टींचा आनंद घेतलात जे काही तुम्हाला चांगले शिकायला मिळाले त्याचा उल्लेख थोडक्यात नक्की करा. हे कायम लक्षात ठेवा की आधीच्या नोकरीतील लोकांचा तुम्हाला भविष्यात कधीतरी उपयोग होऊ शकतो. म्हणूनच बाहेर पडताना आनंदाने आणि सकारात्मक भावना ठेवून बाहेर पडा.

सकारात्मक दृष्टीकोन ठेवा

लिहिताना सकारात्मक स्वर असू द्या. तुम्ही कंपनीत ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या असतील अनुभवल्या असतील त्याचा जरूर उल्लेख करा. कंपनीबद्दल चार चांगल्या गोष्टी जरूर लिहा.

प्रशिक्षण आणि जबाबदरी

तुमच्या बदली जो कोणी उमेदवार येईल त्याला प्रशिक्षण देणे याची जबाबदारी तुम्ही आपणहून घ्या. त्याला लागेल ती मदत तुम्ही कराल असे आश्वासन नक्की द्या. त्यासाठी पुरेसा वेळ द्या आणि योग्य ते सहकार्य  करा जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत प्रशासनाची कोणतीही गैरसोय होणार नाही.

तुमच्या कामाबद्दल तपशील जरूर समाविष्ट करा

कंपनीतून बाहेर पडताना तुमचे सर्व काम तुम्ही पूर्ण कराल याची हमी नक्की द्या. तुम्ही जाताना कोणाला तुमचे काम हस्तांतरित करत आहात त्याची माहिती नक्की द्या.

राजीनामा देण्याआधी पूर्णपणे वाचा

राजीनामा  देण्याआधी तो नीट वाचून घ्या, त्यात काही चुका असतील तर शक्य ते बदल आणि दुरुस्ती करून मगच तो पुढे पाठवा.राजीनाम्याचे पत्र देताना कंपनीबद्दल कोणत्याही नकारात्मक गोष्टी लिहू नका. लिहिताना नेहमी फक्त चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींचाच समावेश करा. 

राजीनामा वेगवेगळ्या प्रकारे लिहिला जातो. तुमच्या माहितीसाठी येथे एक नमुना दिला आहे. तुमच्या गरजांनुसार तुम्ही त्यात बदल करून त्याचा वापर करू शकता.

                                                    तुमचे नाव आणि पत्ता, असल्यास इमेल आयडी

तारीख                                                                    

पद

कंपनीचे नाव

कंपनीचा पूर्ण पत्ता

प्रिय महोदय

कृपया या पत्राचा स्वीकार व्हावा कारण मी माझ्या पदावरून राजीनामा देत आहे. {तारीख} हा माझा कामावरील शेवटचा दिवस असेल. मला दुसर्या कंपनीकडून उत्तम संधी मिळत आहे आणि हे कारण या पदाचा राजीनामा देण्यास पुरेसे आहे.

इतकी वर्षे या कंपनीत काम करणे हा एक सुखद अनुभव होता. येथे मला खूप काही शिकायला मिळाले आणि मला सहकारी वर्गाची उत्तम साथ मिळाली. या कंपनीचे सगळे account पाहणे ही माझी मुख्य जबाबदारी होती. तुमची कंपनी ही प्रगतीशील आणि एक उत्तम कंपनी असून मी तुम्हाला आणखी यश मिळो अशा शुभेच्छा देतो.

जाताना मी माझे सर्व काम आणि जबाबदार्या पूर्ण करून जाईन तसेच संबंधित व्यक्तींना काम हस्तांतरित करीन. माझ्या जागी नियुक्त केलेल्या व्यक्तीला योग्य मदत आणि प्रशिक्षण देण्याची जबाबदारी मी स्वीकारीन. मला एक चांगली संधी दिली याबाबत प्रशासनाचे पुन्हा एकदा आभार. मी तुम्हाला आणि तुमच्या कर्मचारीवर्गाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो.

आपला विश्वासू

(तुमचे नाव आणि तुमचा संपर्क क्रमांक किंवा पत्ता )

राजीनामा हा एक अनिवार्य आणि आवश्यक असा दस्तऐवज आहे जो कंपनी सोडताना दिला जातो. याचा अर्थ असा  होती की तुमचे पद त्या तारखेपासून बरखास्त होते आहे.

जितक्या लवकर तुम्ही राजीनामा द्याल तितके चांगले जेणेकरून तुमच्या वरिष्ठांना योग्य ती तयरी करता येईल तसेच तुमच्या जागी इतर कोणाची नियुक्ती करता येईल. तुमच्या करारात याबाबत काय लिहिले आहे ते जाणून घ्या. जर तुमच्या पद सोडण्याच्या तारखेच्या दोन आठवडे आधी सूचना दिलीत तर ते सोयीचे ठरेल. जर तुम्हाला तडकाफडकी कोणत्याही कारणास्तव राजीनामा द्यावा लागत असेल तर त्याची माहिती तुमच्या वरिष्ठांना  देणे आवश्यक आहे. त्याची एक प्रत तुमच्या बॉसला देऊन एक प्रत तुमच्याकडे ठेवा. जर तुम्ही  घरातून काम करत असाल तर मेल्स्वारे तुम्ही राजीनामा पाठवू शकता म्हणजे तुमचा वेळ वाचेल. आकर्षक पद्धतीने राजीनामा द्या आणि एका नवीन प्रवासाला सकारात्मक पद्धतीने सुरुवात करा.